
अडगाव बु. प्रतिनिधी दिपक रेळे
तेल्हारा तालुक्यातील अडगांव बु येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अडगाव बु. येथे लहान चिमुकल्यांच्या वेशभूषा व दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या प्रांगणात सकाळीच वृंदावनचा देखावा साकारण्यात आला होता.
या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते आठवी शाळेची विद्यार्थिनी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, बळीराम व गवळ्यांच्या आकर्षक वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लहान मुलांनी डोक्यावर सोनेरी मुकुट, मोरपंख, बासरी व पारंपारिक धोतर-कुर्ता परिधान करून प्रत्यक्ष बालगोपालच अवतरल्याचा भास निर्माण केला. यावेळी शाळेच्या पटांगणा मध्ये दहीहंडीचा कार्यक्रम
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक बंधू व भगिनींनी विशेष परिश्रम घेतले. मुलांची वेशभूषा, सजावट, संगीत व दहीहंडीची तयारी शिक्षक व शिक्षिका आणि सहकारी शिक्षकवृंद यांनी पार पाडली. शिक्षिकांनी मुलांना कृष्ण लीलांवर आधारित गाणी व नृत्य शिकवले.
याप्रसंगी मुख्याध्यापक आपल्या मनोगतात म्हणाले, “आजच्या या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील सत्य, प्रेम व एकतेचा संदेश मिळावा या हेतूने हा उपक्रम राबवला आहे. लहान मुलांमध्ये अशा कार्यक्रमातून आत्मविश्वास वाढतो. पालकांनी व शिक्षकांनी दाखवलेला उत्साह हा कौतुकास्पद आहे. आमची शाळा केवळ पुस्तकी ज्ञानच देत नाही तर संस्कारक्षम पिढी घडवण्याचे काम करते.”
कार्यक्रमाच्या शेवटी लहान मुलांनी दहीहंडी फोडून ‘गोविंदा आला रे आला’ चा जयघोष केला. पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षकवृंदांनी केले.