
तेल्हारा ता.प्रतिनिधी: नंदकिशोर नागपुरे
समाजातील विविध घटकांच्या सामाजिक, मानसिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक उन्नतीसाठी आणि व्यसनमुक्तीसह सर्वसमावेशक उत्थानासाठी अनेक व्यक्ती अहोरात्र प्रबोधन व प्रत्यक्ष कार्य करत असतात. अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा शासन दरबारी सन्मान केला जातो, त्यांना पुरस्कार देऊन समाजात प्रतिष्ठेचे स्थान दिले जाते. वयाची ४०-५० वर्षे सामाजिक कार्यासाठी अर्पण केलेल्या या व्यक्तींना सध्या अल्प मानधन, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, तसेच एसटी प्रवास व शासकीय विश्रामगृह सवलत दिली जाते.
मात्र, उतरत्या वयात या कार्यकर्त्यांना उदरनिर्वाहाचे भक्कम साधन मिळावे, या दृष्टीने राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सन्मानित करण्यात आलेल्या सर्व पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्यांना दरमहा १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे. यासोबतच, ‘म्हाडा’सह सर्व प्रकारच्या शासकीय घरकुल योजनांमध्ये या पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्त्यांना प्राधान्याने घरकुल मंजूर करण्यात यावे, अशीही आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या सर्व प्रमुख मागण्यांचे निवेदन अकोला जिल्ह्याच्या सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना नुकतेच सुपूर्त करण्यात आले असून, सदर निवेदन पुढील योग्य कार्यवाहीसाठी सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले आहे.
या निवेदनावर राज्यातील प्रमुख पुरस्कारार्थी पी. बी. भातकुले, रामचंद्र गायकवाड, सुनंदाताई चांदणे, जे. पी. सावंग, अनुप खरारे, बाळकृष्ण गायकवाड, अशोकराव रामटेके, प्रकाश अवचार, वसंतराव मानवतकर आणि प्रतिभाताई अवचार यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांच्या या न्याय्य मागण्यांवर शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.