
संपादक =गुरुदेव इसमोरे
तेल्हाऱ्यात संभाजीराजेंच्या नेतृत्वात ‘आसूड मोर्चा’; हेक्टरी १ लाखांची मदत, संपूर्ण कर्जमाफीसह पीकविम्याची रक्कम तातडीने देण्याची मागणी
तेल्हारा, दि. ५ : दुष्काळ, अवकाळी पाऊस, नापिकी आणि नैसर्गिक आपत्तींच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांवरून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. छत्रपती संभाजीराजेंच्या उपस्थितीत सोमवारी तेल्हारा तहसील कार्यालयावर हजारो शेतकरी-शेतमजुरांचा ‘आसूड मोर्चा’ काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत दुष्काळग्रस्तांना तातडीने दिलासा देण्याची मागणी करण्यात आली.
प्रशांत काशीराम डिक्कर यांच्यासह छत्रपती संभाजीराजे, गजानन पाटील बंगाळे, शुभम इसापूरे, आशिष शेंडके, रोशन देशमुख, वैभव खाडे व सुधाकर हागे यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले आहे. सरकारने मागण्यांवर गांभीर्याने विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास शेतकरी-शेतमजुरांच्या वतीने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
हेक्टरी लाखाची मदत, भूमिहीनांना ५० हजार
निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत, दुष्काळी परिस्थितीत शेतात काम करणाऱ्या भूमिहीन शेतमजुरांच्या कुटुंबांना किमान ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य, तसेच शेतकऱ्यांची बिनाअट सरसकट कर्जमाफी करून नव्याने तात्काळ पीककर्ज उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे. मागील वर्षाचा रखडलेला पीकविमा आणि चालू वर्षाच्या १०० टक्के विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सोयाबीनचे बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांचे कायमस्वरूपी परवाने रद्द करून बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे, गारपीट व चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने बँक खात्यावर वर्ग करणे, तसेच ‘सुमतीबाई सुकळीकर’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील महिला बचत गटांची संपूर्ण व्याजाची रक्कम परत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पाणी, वीज, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त अन् आत्महत्या रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना
तेल्हारा तालुक्यातील धरणाचे पाणी बंद करून नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा, शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसाला १२ तास वीज द्यावी, वन्यप्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करून पिकांच्या संरक्षणासाठी शेतात कंपाउंड वॉल उभारण्यास मदत करावी, तसेच शेतमाल वाहतुकीसाठी प्राधान्याने शेतरस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
विशेषतः राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तात्काळ दुष्काळाच्या सोयी-सुविधा सुरू कराव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. सरकारने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा शेतकरी-शेतमजुरांच्या वतीने आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.