
नंदकिशोर नागापुरे- तेल्हारा तालुका प्रतिनिधी
मनब्दा:
येथील जि. प. व. प्राथमिक शाळा मनब्दा येथे दरमहा राबविण्यात येणाऱ्या ‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमाअंतर्गत आज (दि. ३ ऑक्टोबर २०२६) महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून व ‘सेवा संकल्प अभियाना’ अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विश्वासभाऊ पाथ्रीकर यांनी गावातील सेवाभावी नागरिक आणि पालकांना शाळेतील वर्गखोल्या तसेच शालेय परिसर स्वच्छ करण्यासाठी ‘एक दिवस शाळेसाठी’ देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या हाकेला प्रतिसाद देत गावातील पालकवर्ग, सेवाभावी नागरिक आणि महिला मंडळाने या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या श्रमदानादरम्यान गावातील पुरुष मंडळींनी शाळेच्या परिसरात वाढलेले गांजर गवत आणि काटेरी झुडपे काढून परिसर साफ केला. तर महिला मंडळी व शिक्षिकांनी सर्व वर्गखोल्यांची झाडपूस करून त्या पाण्याने स्वच्छ धुवून काढल्या. तसेच आरोग्यदायी वातावरणासाठी वर्गखोल्या फिनाईलचा वापर करून निर्जंतुक करण्यात आल्या.
या उपक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, समितीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच गावातील महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून केलेल्या या श्रमदानानंतर शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला. गावातील नागरिकांच्या या सहकार्यामुळे शाळेचा परिसर अत्यंत स्वच्छ व प्रसन्न झाला असून, शाळा व्यवस्थापनाने सर्व सहभागींचे आभार मानले.