
दानापूर (विशेष प्रतिनिधी): नंदकिशोर नागपुरे
येथे अडीच दिवसीय गौरी महालक्ष्मी पूजनाचा उत्सव अत्यंत श्रद्धा, उत्साह आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. उत्सवाच्या निमित्ताने गावातील अनेक घरांमध्ये महालक्ष्मीचे पारंपरिक पद्धतीने आगमन झाले होते.
महिलांनी घरोघरी आकर्षक सजावट, नयनरम्य रांगोळ्या आणि विद्युत रोषणाई करून श्री महालक्ष्मीचे जल्लोषात स्वागत केले. उत्सवासाठी खास माहेरवाशिणींचे आगमन झाल्याने प्रत्येक घरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
२१ प्रकारच्या नैवेद्याचे समर्पण
पूजनाच्या मुख्य दिवशी महालक्ष्मीला २१ प्रकारच्या विविध पदार्थांचा खास गोड नैवेद्य अर्पण करण्यात आला. या वेळी घराघरांतून गावच्या व कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी तसेच भरभराटीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. अडीच दिवसांच्या या धार्मिक पूजनानंतर परंपरेनुसार महालक्ष्मीचे अत्यंत भावूक वातावरणात विसर्जन करण्यात येते.
विविध ठिकाणी भक्तिमय वातावरण
दानापूर येथील गणेश भारती, रमेश माऊलकार, रवींद्र ढाकरे, अरुण राऊत, महादेवराव वानखडे आणि रामदासजी भालेराव यांच्या निवासस्थानी अत्यंत भक्तिमय वातावरणात हे पूजन पार पडले. या ठिकाणी परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
गावातील नागरिकांनी घरोघरी जाऊन श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा आस्वाद घेतला. या उत्सवामुळे गावात परस्पर स्नेहाचे, एकोप्याचे आणि भक्तीचे मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.