
हिवरखेड प्रतिनिधी
– धिरज बजाज, हिवरखेड
हिवरखेड ते अकोट राज्य महामार्गाचे काम MSIDC मार्फत कंत्राटदाराकडून गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत संथ गतीने आणि अपूर्ण अवस्थेत असल्याने या मार्गावर सातत्याने भीषण अपघात होत असून अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
आज या महामार्गावर लहान पुलाच्या कामासाठी मोठे खोदकाम करण्यात आले आहे. खोदकाम केल्यानंतर निघालेली माती रस्त्याच्या दोन्ही बाजूला तशीच टाकून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी कोणताही सूचना फलक, माहिती फलक किंवा वाहनांना आधी थांबवण्यासाठी बॅरिकेडिंग लावण्यात आलेले नाही.
रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहन चालकाला हा मातीचा ढिगारा अचानक दिसत नसल्याने वाहन थेट धडकून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. कंत्राटदाराच्या या हलगर्जी कारभारामुळे सरळ-सरळ अपघातांना आमंत्रण दिले जात आहे.
या अगोदरही या मार्गावर अनेक जण अपघातग्रस्त झाले असून कित्येकांना जीव गमवावा लागला आहे. तरीही संबंधित यंत्रणा आणि प्रशासन सुधारायला तयार नाही. केवळ खोदकाम करून रस्ता तसाच सोडून देणे म्हणजे जणू भरधाव वाहने अपघातग्रस्त व्हावीत हाच कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचा हेतू असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
या प्रकरणी प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून योग्य ती सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.