
तेल्हारा प्रतिनिधी :-
तेल्हारा, तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने सुरुवातीला हजेरी लावल्यानंतर आता पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे ठाकले आहे. जून-जुलै महिन्यात झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने अनेक भागातील पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. पावसाअभावी जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून, कोवळी पिके माना टाकू लागली आहेत. विशेषतः कपाशी व सोयाबीन पिकांवर या पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम जाणवत आहे. पिकांसाठी पावसाची नितांत गरज असताना आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच पडत आहे. पिकांच्या वाढीवर परिणाम; उत्पादन घटण्याची भीती पावसाने दडी मारल्यामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे. पिकांना आवश्यक पाणी उपलब्ध न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. आधीच बियाणे, खते, औषधे, मज्री आणि मशागतीचा वाढलेला खर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यातच पावसाने साथ सोडल्याने खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी केलेला खर्च वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाने तातडीने तेल्हारा तालुक्यातील पिकांची पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे तालुक्यातील शेतीची परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तेल्हारा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी व शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीक नुकसानभरपाई, पिकांचे तातडीने पंचनामे तसेच आवश्यक त्या शासकीय सवलती देण्यात याव्यात. पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे सर्वे क्षण करून नुकसानभरपाईची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशीही मागणी जोर धरत आहे. पावसाचा खंड असतानाच अनेक भागांत कृषी पंपांसाठी वीजपुरवठ्याची अनियमितता शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर घालत आहे. पावसाची प्रतीक्षा आणि वीजपुरवठ्याची समस्या या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
पिके सुकण्याच्या मार्गावर; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची जोरदार मागणी
त्यामुळे महावितरणने कृषी वीजपुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही होत आहे. पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. पिके डोळ्यांसमोर करपताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष शेतात उतरून पंचनामे करावेत आणि तातडीने मदत जाहीर करावी, अशी संतप्त भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. पावसाचा खंड कायम राहिल्यास तेल्हारा तालुक्यात खरीप हंगामावर मोठे संकट ओढवण्याची शक्यता असून, शासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांचा आक्रोश अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
तिल्हारा तालुक्यात तातडीने पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून सर्वेक्षण व पंचनामे करावेत. केवळ कागदोपत्री अहवाल तयार करून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पीक नुकसानभरपाई व आर्थिक मदत मिळावी, तसेच परिस्थितीनुसार तेल्हारा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा. शेतकरी संकटात असताना प्रशासनाने त्याच्या बांधावर पोहोचणे हीच खरी शासनाची जबाबदारी आहे. आता आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष मदतीची गरज आहे.