
तेल्हारा प्रतिनिधी :-
एमसीएन न्यूज मराठीच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार गुणगौरव सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सरोजदेवी किसानलालजी सहकार विद्या मंदिर, बहानपूर रोड, जळगाव जामोद येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सचिन देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. ॲड. संदीप गटले, मा. पवन पाटील (तहसीलदार), मा. डॉ. सुरज जाधव (मुख्याधिकारी, न.प. जळगाव), मा. निलेश काळे, मा. रमेश जाधव, मा. अमोल चौधरी, मा. डॉ. वाकचरे, मा. रंगराव देशमुख, मा. डॉ. किशोर केला, मा. सचिन तायडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महासिद्ध आजी महाराज बाळशास्त्री जांबेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी आयोजक शामभाऊ तायडे, मुख्य संपादक राजीवभाऊ वाडे तसेच निवडक पत्रकारांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्री. दिपक रेळे यांना मान्यवरांच्या हस्ते ‘उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
पत्रकारितेच्या माध्यमातून सत्य घटनांचे निर्भीड वार्तांकन, जनसामान्यांच्या समस्या शासन दरबारी मांडणे तसेच समाजातील विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्याच्या कार्याची दखल घेत श्री. दिपक रेळे यांची ‘उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
यावेळी शैलेश काळे (उपविभागीय अधिकारी) यांनी पत्रकारितेच्या कार्याचे कौतुक केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी श्री. दिपक रेळे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे बहारदार संचालन सुनील भटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजीव वाडे यांनी मानले.
उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री.दिपक रेळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, हा सन्मान त्यांच्या पत्रकारितेच्या कार्याला नवी प्रेरणा देणारा ठरला आहे.