
तेल्हारा -प्रतिनिधी : आनंद बोदडे
तहसील कार्यालयाचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि हिरवाईने नटलेला राहावा, तसेच नागरिकांमध्ये स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने तहसीलदार महेश रामगुंडे यांच्या पुढाकारातून तहसील कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.
तीन वर्षांपूर्वी नायब तहसीलदार विकास राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बगीच्याची विशेष स्वच्छता
या स्वच्छता मोहिमेचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे नायब तहसीलदार विकास राणे यांच्या संकल्पनेतून सुमारे तीन वर्षांपूर्वी तहसील कार्यालय परिसरात निर्माण करण्यात आलेल्या बगीच्याची स्वच्छता करण्यात आली. या बगीच्यातील वाढलेले गवत, कचरा व अनावश्यक झाडाझुडपांची साफसफाई करून परिसराला पुन्हा स्वच्छ व आकर्षक स्वरूप देण्यात आले.
या उपक्रमात नायब तहसीलदार विकास राणे यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, तलाठी, कोतवाल व शिपाई यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान केले. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष हातात झाडू घेत कार्यालय परिसरातील गवत, कचरा व इतर अनावश्यक वस्तू हटवून परिसराची स्वच्छता केली.
स्वच्छता मोहिमेनंतर तहसील कार्यालय परिसरात विविध रोपांची लागवड करण्यात आली. लागवड केलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी घेण्यावरही भर देण्यात आला. त्यामुळे कार्यालय परिसरात स्वच्छतेसोबतच हिरवाई वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शासकीय कार्यालयात विविध कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यामुळे कार्यालयाचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न राहणे महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने ‘स्वच्छ कार्यालय, सुंदर परिसर आणि हरित वातावरण’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
विशेष म्हणजे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केवळ स्वच्छतेचे आदेश न देता स्वतः श्रमदान करून स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या या कृतीतून ‘स्वच्छता ही केवळ जबाबदारी नसून प्रत्येकाची सामूहिक बांधिलकी आहे’, असा संदेश नागरिकांना देण्यात आला.
तहसील कार्यालय परिसरातील बगीच्याची स्वच्छता, परिसरातील कचरा निर्मूलन आणि वृक्षारोपणामुळे कार्यालय परिसराला नव्या स्वरूपाची झळाळी मिळाली आहे. या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, बगीच्याचे नियमित संगोपन व देखभाल झाल्यास परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.