
तेल्हारा प्रतिनिधी:
तेल्हारा तालुक्यातील आदर्श ग्राम पाथर्डी येथील बाजारपेठ भागात श्री रामभरोसे गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आज पारंपरिक उत्साहात व भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. पाथर्डी गावातील हे सर्वात जुने आणि मोठे मंडळ म्हणून ओळखले जाते.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत मंडळातर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुलांच्या विविध स्पर्धा, संगीत खुर्ची आणि पारंपरिक मटकी फोड यांसारख्या विविध उपक्रमांचा समावेश आहे. मंडळातर्फे आकर्षक विद्युत रोषणाई (लायटिंग) आणि मनमोहक देखावे तयार करण्यात आले असून, हे देखावे भाविकांचे मुख्य आकर्षण ठरत आहेत.
उत्सवादरम्यान सर्व नियमांचे काटेकोर पालन करत दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते सायंकाळी महाआरतीचे आयोजन केले जाणार आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत संपूर्ण पाथर्डी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, उत्सवासाठी मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.