
तेल्हारा ता प्रतिनिधी: आनंद बोदडे
तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम किसनदादा घोगे यांच्याविरुद्ध ३१ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष सभेत पारित करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाच्या अंमलबजावणीला विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांनी २१ सप्टेंबर २०२६ रोजी अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे सभापतीपदाबाबत सुरू झालेल्या घडामोडींना तूर्तास ब्रेक लागला आहे.
उपलब्ध आदेशानुसार, अविश्वास ठरावाच्या अंमलबजावणीला तसेच त्या अनुषंगाने ११ सप्टेंबर २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेल्या सभापतीपदाच्या निवडणूक कार्यक्रमालाही पुनरीक्षण अर्जाच्या अंतिम निर्णयापर्यंत अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे.
दरम्यान, आज २१ सप्टेंबर रोजी सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडण्याच्या पार्श्वभूमीवर सभा सुरू होण्यापूर्वीच विभागीय सहनिबंधकांचा अंतरिम स्थगितीचा आदेश ई-मेलद्वारे प्राप्त झाला. त्यामुळे सभापतीपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले असून, निवडणूक प्रक्रियेला अचानक स्थगिती मिळाल्याने इच्छुक उमेदवारांचा अपेक्षाभंग झाल्याचे चित्र निर्माण झाले.
आदेशात नमूद केल्याप्रमाणे, अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्यांना आपले म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी न देता अविश्वास ठराव पारित करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचा विचार करता, निवडणूक प्रक्रिया पुढे गेल्यास अर्जदाराचे संभाव्य नुकसान नंतर भरून काढणे अथवा दूर करणे कठीण होऊ शकते, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मात्र, ३१ ऑगस्ट रोजी पारित झालेला अविश्वास ठराव वैध आहे किंवा सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया कायदेशीर आहे अथवा नाही, याबाबत या अंतरिम आदेशातून कोणतेही अंतिम मत व्यक्त करण्यात आलेले नाही. या सर्व मुद्द्यांवर पुनरीक्षण अर्जाच्या अंतिम सुनावणीवेळी उपलब्ध अभिलेख व लागू कायदेशीर तरतुदींच्या आधारे निर्णय घेतला जाणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
६ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
विभागीय सहनिबंधकांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ अंतर्गत प्रदान अधिकारानुसार अर्जदाराचा स्थगिती अर्ज मंजूर केला आहे. तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पातूर यांनी ११ सप्टेंबर २०२६ रोजी निर्गमित केलेल्या पत्रालाही पुनरीक्षण अर्जाच्या अंतिम निर्णयापर्यंत अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावणीत काय निर्णय होतो, याकडे बाजार समितीतील पदाधिकारी, संचालक, सभापतीपदासाठी इच्छुक उमेदवार आणि संबंधितांचे लक्ष लागले आहे.