
तेल्हारा ता.प्रतिनिधी..नंदकिशोर नागपुरे
येथील श्री. रामचंद्र विखे यांच्या निवासस्थानी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. रात्री ठीक १२ वाजता भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत बालकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
जन्मवेळेपर्यंत उपस्थित भाविकांनी टाळ, मृदंग आणि तबल्याच्या तालावर अखंड भजन-कीर्तन करत परिसर भक्तिमय करून सोडला होता. मध्यरात्री १२ वाजता कृष्णजन्म होताच महाआरती करण्यात आली. यावेळी झालेल्या हरिनामाच्या जयघोषाने आणि ‘गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा’च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
आरतीनंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या जन्मोत्सव सोहळ्याला परिसरातील महिला नागरिकांनी आणि भाविकांनी मोठी उपस्थिती लावली होती.