
दानापूर (प्रतिनिधी):नंदकिशोर नागपुरे
येथील जयभवानी नवदुर्गा उत्सव मंडळ आणि नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळ यांच्या वतीने सांप्रदायिक भजनी मंडळाच्या माध्यमातून अत्यंत भक्तिमय वातावरणात नवदुर्गेची मिरवणूक काढण्यात आली होती. ‘जय हरी माऊली’च्या जयघोषात आणि भजनांच्या गजरात भाविकांनी या मिरवणुकीचा आनंद लुटला. या उत्कृष्ट व भक्तिमय उपक्रमाचे कौतुक म्हणून दानापूर प्रेस क्लब आणि गावकऱ्यांच्या वतीने दोन्ही मंडळांचा विशेष सन्मान करण्यात आला.
जयभवानी नवदुर्गा उत्सव मंडळ आणि नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष सर्वश्री अनिल बावस्कर व गोपाल कतोरे यांचा दानापूर प्रेस क्लब व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा सन्मान जेष्ठ नागरिक रामचंद्र हागे, विजय दांदळे व त्यांच्या धर्मपत्नी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास दानापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भगवान हागे, उपाध्यक्ष नंदकिशोर नागपुरे, माजी उपसरपंच साहेबराव वाकोडे, माजी पंचायत समिती सदस्य संदीप पालीवाल, जेष्ठ पत्रकार प्रमोद हागे, श्यामकुमार ढाकरे, धम्मपाल वाकोडे, शेख राजू, सुनीलकुमार धुरडे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.