तेल्हारा प्रतिनिधी-
भारतीय संविधान म्हणजे भारतातील नागरिकांसह पर्यावरणाचेही रक्षण करणारा हक्क-अधिकारांचा लेखाजोखा होय, असे प्रतिपादन भिमराव परघरमोल (लेखक, व्याख्याता तथा अभ्यासक फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा, तेल्हारा) यांनी केले.सविस्तर वृत्त असे की दिनांक १५सप्टेंबर २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये संविधान मंदिराचे निर्माण करून त्याचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील ३३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना जोडण्यात आले असून सर्वांनी तो कार्यक्रम ऑनलाईन बघितला.
ऑनलाइन कार्यक्रम संपल्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा येथे संविधानाधारित प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा अध्यक्षस्थानी विईके साहेब, प्राचार्य हे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये विजय डांगरा (जीआयएमसी, सदस्य) सौ. मनसुटे मॅडम, शेगोकार सर मुख्य लिपिक हे होते.
प्रथम महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून व्याख्यानाला सुरुवात करण्यात आली. भिमराव परघरमोल आपल्या व्याख्यानात म्हणाले की, भारतीय संविधान हा आपल्या हक्क अधिकारांचा लेखाजोखा असून त्याचा प्रत्येकाने सन्मान, सुरक्षा व संवर्धन केले पाहिजे. तो दस्तावेज निर्जीव असला तरी तो भारतातील सजीव निर्जीव व पर्यावरणाचे कायदेशीर रक्षण करतो, असे ते म्हणाले. कार्यक्रमानंतर पाहुण्यांच्या हस्ते संविधान मंदिराचे उद्घाटन करून, त्यामध्ये भारतासह अनेक देशांचे संविधान ठेवून, ते दालन सर्वांना वाचण्यासाठी खुले करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन थाटे यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.