तेल्हारा प्रतिनिधी :- विकास दामोदर
घोडेगाव व्यक्ती जेव्हा जन्माला येतो तेव्हा नानाविध ऋण घेऊन जन्माला येतो व या जीवनातच त्याला त्या ऋणांची फेड करावी लागते. या ऋणापैकीच ” समाजऋण ” हे प्रत्येक जण आपापल्या परीने फेडण्याचा प्रयत्न करतो.
तेल्हारा येथून जवळच असलेल्या घोडेगाव येथील प्रा. प्रदिप ढोले यांचे लहान भाऊ स्व. विजयराव ढोले यांचे दोन वर्षांपूर्वी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते तो दिवस म्हणजे 17 ऑक्टोबर व आजच्या दिनी त्यांचा द्वितीय स्मृतिदिन हेच औचित्य साधून विजयभाऊ यांचे मुले अजिंक्य व परुल ढोले यांनी गावातीलच जि. प. व. प्रा. मराठी शाळेत तीन दिवसापूर्वी येऊन काही समस्या जाणून घेतल्या आधी गावातीलच दानशूर रितेश दुधाट यांनी या शाळेला आर. ओ. मशीन सप्रेम भेट दिली. त्या मशीनला पाणी पुरवण्यासाठी दीड हजार लिटरची पाण्याची टाकी वरील मजल्यावर ठेवण्यात आली परंतु पाणी वर सहजा सहजी चढत नव्हते परिणामी कधी कधी विद्यार्थ्यांना पाणी सुद्धा मिळत नव्हते नेमकी हिच समस्या हेरून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष कवळे, मुख्यध्यापक बारगीर सर व शिक्षणप्रेमी प्रा. विकास दामोदर यांनी पंप मशीनची समस्या मांडली , यासाठी क्षणाची विलंब न करता अजिंक्य ढोले यांनी पंप मशीन देण्याचे कबूल केले व त्यांनी महागडी अशी पंप मशीन, सात घड्याळी, सात गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफीज व बारा खुर्च्या शाळेला सप्रेम भेट दिल्या.आजच्या पुण्यस्मरण दिनी विजुभाऊ ढोले यांना शाळेच्या वतीने आदरांजली देण्यात आली.
सदर कार्यक्रमचे अध्यक्ष मुख्याध्यापक बारगीर सर, तर प्रमुख अतिथी म्हणून तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रा. प्रदिप ढोले तर प्रमुख उपस्थिती सतीश वा. ढोले, उत्तम ढोले, रमेश ढोले, प्रशांत ढोले, नंदकिशोर ढोले, तंटामुक्ती अध्यक्ष मोईन खान व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष कवळे व शिक्षणप्रेमी प्रा. विकास दामोदर, राजू ना. ढोले, राजू भाकरे हे होते. आज रोजी बहुतांश जि. प. शाळेमध्ये समस्या दिसून येतात परंतु येथील शाळेत लोकांच्या दानातून सर्व सुखसोयी व आनंददायी शैक्षणिक वातावरण कसे होईल हे गावच्या लोकांद्वारे पुरेपूर प्रयत्न केल्या जात आहे, शक्यतोवर या शाळेमध्ये शिकणारी मुले ही बहुतांश गरिबांचीच असतात, सुधारणावादी संतांनी सुद्धा सांगून ठेवलेले आहे की खरा देव हा माणसात असतो. “मानवसेवा हिच खरी ईश्वर सेवा होय.”याचा प्रत्यय आजच्या कार्यक्रमातून निदर्शनास आला.
कार्यक्रम यशस्वीतेस मुख्याध्यापक बारगीर सर यांच्या मार्गदर्शनात सौ. तायडे मॅडम, सौ. डांगे मॅडम, सौ. बारगीर मॅडम, सौ. झाडे मॅडम व सौ. गावंडे मॅडम यांचा हातभार लागला. विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण होते, शेवटी शिक्षणप्रेमी प्रा. विकास दामोदर यांनी या दानदात्यांचे आभार मानले.
